ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प पर्यटकांसाठी खुला करावा – आ. सुधीर मुनगंटीवार

0
518

त्‍वरीत सकारात्‍मक निर्णय घेणार –अ.मु.स. असीम गुप्‍ता यांचे आश्‍वासन

चंद्रपूर :
कोरोना संसर्गामुळे बंद करण्‍यात आलेला ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प पर्यटकांसाठी खुला करण्‍यात यावा अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी आज मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्‍य सचिव श्री. असीम गुप्‍ता आणि जिल्‍हाधिकारी श्री. अजय गुल्‍हाने यांच्‍याशी चर्चा केली. सदर व्‍याघ्र प्रकल्‍प पर्यटकांसाठी खुला करण्‍याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्‍यात येईल, असे आश्‍वासन अपर मुख्‍य सचिव असीम गुप्‍ता यांनी दिले.

या मागणी संदर्भात ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पातील रिसोर्ट व्‍यावसायिकांच्या  शिष्‍टमंडळाने आ. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व निवेदन सादर केले.शिष्टमंडळासमक्ष आ. मुनगंटीवार  यांनी श्री असीम गुप्ता यांच्याशी चर्चा केली. असीम गुप्‍ता यांच्‍याशी चर्चा करताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, कोरोनाच्‍या वाढत्‍या संसर्गामुळे ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प पर्यटकांसाठी बंद करण्‍यात आला होता. कोरोनाची रूग्‍णसंख्‍या आता आटोक्‍यात आली असल्‍याने सदर व्‍याघ्र प्रकल्‍प पर्यटकांसाठी खुला करण्‍यास आता कोणतीही हरकत नाही. सदर व्‍याघ्र प्रकल्‍प बंद असल्‍यामुळे परिसरातील रिसोर्ट व्‍यावसायिक तसेच त्‍यावर अवलंबून असलेल्‍या घटकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशातील एकही व्‍याघ्र प्रकल्‍प सद्यःस्थितीत बंद नाही. अशा परिस्‍थीतीत केवळ ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प बंद असणे संयुक्‍तीक नाही. हा व्‍याघ्र प्रकल्‍प त्‍वरीत पर्यटकांसाठी खुला करण्‍यात यावा, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे. शिष्‍टमंडळात संजय मानकर, संजय ढिमोले, आशिष पुराणिक, शुभम ढिमोले आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here