भंडारा : शेतात पिकाची पाहणी करण्यास गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करुन ठार केले असल्याची घटना आज दि. ३० सप्टेंबर २०२२ शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव शेतशिवारात उघडकीस आली.
प्राप्त माहिती नुसार ‘सीटी – १’ वाघाची ही तेरावी शिकार असून लाखांदूर तालुक्यातील ही चौथी घटना आहे.
सदर घटनेतील मृतक शेतकऱ्याचे नाव तेजराम बकाराम कार वय (४५) वर्ष असून रा. कन्हाळगाव असे आहे. आज सकाळच्या सुमारास तेजराम गावातील मनोज शालिक प्रधान यांच्यासोबत शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होतें.
पिकाची पाहणी करून शेळ्यांसाठी झाडाच्या फांद्या तोडावयास गेलेल्या तेजरामवर वाघाने अचानक हल्ला चढविला. सोबत असलेल्या मनोजने आरडाओरड करण्यास सुरवात केली.
सदर घटनेची माहिती मोबाईल वरून गावकऱ्यांना दिली. दरम्यान, गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती देताच वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या नेतृत्वात वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी मौका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
परिसरातील नागरिक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी करीत आहेत.