अखेर ‘ती’ वाघीण जेरबंद; पाच महिन्यांपासून परिसरात होते भीतीचे वातावरण

0
166

(७० ट्रॅप कमॅरेऱ्यांसह १०० वन कर्मचाऱ्यांची होती नजर)
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
मागील पाच महिन्यांपासून सावली तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला वनपरिक्षेत्र कार्यालय सावली अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवन क्षेत्रातील कक्ष क्रमांक ११४ मध्ये बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांसह वन विभागानेही सुटकेचा निःश्वास सोडला. त्या वाघिणीला पकडण्यासाठी जवळपास ७० ट्रॅप कॅमेरे व शंभरपेक्षा अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्या वाघिणीला नागपूरच्या गोरेवाडा प्रकल्पात पाठविण्यात येणार आहे.

चार जणांचा घेतला होता बळी
सावली तालुक्यातील बोरमाळा, चक विरखल, वाघोली बुटी या परिसरात भिती निर्माण केली होती. ३० मार्चला बोरमाळा येथील हर्षल काळमेघे या चार वर्षीय बालक घराशेजारी शौचाला बसला होता. तेव्हा वाघिणीने त्याला उचलून नेत ठार केले. १८ एप्रिल रोजी चक विरखल येथील मंदाबाई सिडाम हिला ठार केले होते. २६ एप्रिल रोजी ममता बोदलकर या वृद्ध महिलेस ठार केले होते. तर, उपवन क्षेत्र व्याहा खुर्द अंतर्गत वाघोली येथील प्रेमिला रोहनकर हिच्यावरही वाघ/बिबट्या ने हल्ला केला होता.
ही कारवाई चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक निकिता चौरे यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक आदेश शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरूडे, सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रवीण विरूटकर, संरक्षण पथकाचे प्रमुख डॉ. कुंदन पोडचलवार, सावलीचे क्षेत्र सहायक राजू कोडापे, व्याहाड खुर्दचे आर. एम. सूर्यवंशी, पेंढरीचे अनिल मेश्राम, पाथरीचे एन. बी. पाटील यांच्यासह सर्व वन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यात प्रामुख्याने पशुधन विकास अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व शूटर अजय मराठे यांनी मोलाची भूमिका ठरली.


“वन विभागाने जरी या वाघाला जोरबंद केले असले तरीही परिसरातील लोकांनी जंगल परिसरात किंवा जंगलालगतच्या शेत परिसरामध्ये वावरताना वन्य प्राण्यांच्या हमल्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याकरता सावधानी बाळगणे व काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here