सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील व्याहड बूज, वाघोली बुटी, सामदा या परिसरात गेल्या आठवड्याभरापासून चांगलाच धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास अखेर सोमवार, 26 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.या बिबट्याने व्याहाड बूज येथील गंगुबाई रामदास गेडाम या महिलेला घरातून बाहेर काढून ठार केले. तसेच वाघोली बुटी येथे तुळसा बाबुराव म्हशाखेत्री या महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच सामदा येथे विठ्ठल गेडाम या शेतकऱ्याला जखमी केले होते. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सावली वनविभागाने 6 पिंजरे लावले होते. मात्र तो हुलकावणी देत होता.
मात्र, सोमवारी सायंकाळी बिबट त्या पिंजऱ्यात प्रथम घटनास्थळी डोंगरी जवळ अडकला आणि परिसरातील जनतेने एकच जल्लोष केला. बिबट सापडल्याची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी त्या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी नैतात असून वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी, वनपाल बुरांडे या ठिकाणी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.