सकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे पक्षीनिरीक्षणासाठी घराबाहेर पडली. गावाबाहेर जाताच माझे लक्ष एका सुंदर हिरव्यागार रंगाच्या पक्षाकडे गेले. तो छोटा पक्षी बांबूच्या एका छोट्या फांदीवर बसला होता. त्याच्या डोक्यावर व मानेवर केसरी रंगाची सुंदर छटा होती व बाकदार चोच होती . हा सुंदर पक्षी म्हणजे वेडा राघू .या सुंदर दिसणाऱ्या पक्षाबाबत असे म्हटले जाते की तो एखाद्या फांदीवर बसलेला असेल आणि आपण दगड मारला तर उडून जातो आणि पुन्हा त्याच फांदीवर येऊन बसतो .इतर पक्षांच्या बाबतीत मात्र असं होत नाही. कदाचित तो डोक्याने वेडा असेल म्हणूनच त्याला वेडा राघू म्हणत असतील .अशा सुंदर पक्षाचे निरीक्षण करताना जवळच्याच एका रेतीच्या ढिगाराकडे लक्ष गेले आणि त्यातील एका बिळातून मी वेडा राघू ला बाहेर पडताना पहिले .यापूर्वी मी कधीच वेडाराघू पक्षाचे घरटे बघितले नव्हते .आता मी त्या घरट्यांचे निरीक्षण करू लागलो . थोड्या वेळात एका बिळातून वेडाराघू बाहेर पडला आणि जवळच्याच बांबूच्या एका फांदीवर बसून चोचीत खाद्य पकडले आणि इकडे तिकडे बघून बिळात शिरला ही कृती त्याने अनेकदा केली म्हणजेच तो आपल्या पिल्लांना भरवण्यासाठी बिळात थोड्या थोड्या वेळाने जे जा करीत होता .निसर्गातील अतिशय सुंदर अशा वेडा राघू पक्षाला अडथळा होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन पक्षीनिरीक्षणाचा मी आनंद घेतली.
शहनाज सुलेमान बेग
पर्यटक मार्गदर्शक, ताडोबा
9595125939