ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जैवविविधतेच्या नोंदीसाठी मचान जनगणना 

0
476

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग)

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी प्रमाणे यंदाही बुद्ध पौर्णिमाच्या दिवशी उन्हाळी मचान जनगणना करण्यात येत आहे. दि. 12 मे 2025 रोजी प्रखर उन्हाळ्याच्या काळात ही पारंपरिक व वैज्ञानिक पद्धतीने केली  जाणारी जनगणना जंगलातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

या उपक्रमासाठी बफर पर्यटनांतर्गत चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव आणि शिवणी या सहा वनपरिक्षेत्रांमध्ये एकूण ५० मचाणांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या कालावधीत पाण्याच्या शोधात असलेले वन्यजीव विविध पाणवठ्यांवर येतात, आणि अशा वेळी उभारण्यात आलेल्या उंच मचानींवरून वन्यजीव निरीक्षण केले जाते. या उपक्रमात वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, निसर्गप्रेमी तसेच स्थानिक ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

प्रत्येक मचानावर संध्याकाळी ४ वाजता निरीक्षक आणि अधिकृत गाईड यांची नेमणूक केली जाते. हे निरीक्षक रात्रभर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत पाणवठ्याजवळ येणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करतात व त्यांच्या संख्येची, जातीची, वर्तनाची आणि येण्याच्या वेळेची नोंद डायरीमध्ये करतात. ही माहिती नंतर वन विभागाकडे सादर केली जाते.

या जनगणनेमुळे वाघ, बिबट्या, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय, वानर, रानडुक्कर आदी प्रमुख प्राण्यांची उपस्थिती तसेच त्यांच्या वावराच्या सवयींचा महत्त्वपूर्ण डेटा गोळा होतो. या माहितीच्या आधारे संरक्षण धोरणे आखण्यात मदत होते आणि इको-पर्यटनासाठीही मार्गदर्शन मिळते.

वन विभागाने यावर्षी काही विशेष नियम लागू केले आहेत:

  • प्रत्येक मचानावर केवळ 2 व्यक्तींना प्रवेश दिला जाईल.
  • प्रत्येकासोबत  TATR चा अधिकृत गाईड अनिवार्य आहे.
  • धूम्रपान व मद्यपान यावर कडक बंदी आहे. नियमभंग केल्यास ₹५,००० दंड आकारण्यात येईल व मचानावरून बाहेर काढण्यात येईल.
  • टॉर्च वापरण्यास मनाई आहे; नैसर्गिक चंद्रप्रकाशाचा वापर करावा.
  • प्लास्टिक साहित्य वापरण्यास आणि कचरा टाकण्यास मनाई आहे.
  • उग्र वास असलेले अन्नपदार्थ आणू नयेत.
    रात्री शौचालयासाठी गाईडची सोबत अनिवार्य आहे.
  • पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षिततेची व आरोग्याची काळजी घ्यावी.

प्रमुख सूचना :
सफारी गेटवर दुपारी ४:०० वाजता वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
मचानपर्यंत जाण्यासाठी अधिकृत जिप्सीनेच प्रवास करावा लागेल; खासगी वाहनांना प्रवेश नाही.
सकाळी परत त्याच जिप्सीने आणण्यात येईल.

शुल्क तपशील:
मचान शुल्क: ₹१,५०० (ऑनलाईन भरणा)
मार्गदर्शक शुल्क: ₹१,००० (जिप्सीवर थेट भरणा)
जिप्सी शुल्क: ₹२,००० (जिप्सीवर थेट भरणा)

एकूण खर्च: ₹४,५००

नोंदणीसाठी संकेतस्थळ:
https://mytadoba.mahaforest.gov.in

संपर्क: स्थळावरही मर्यादित बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. दि. २८ एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग सुरू होणार आहे. एकूण १०० निसर्गप्रेमी ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवू शकतील.

ताडोबाची ही मचान जनगणना केवळ प्राण्यांच्या मोजणीपुरती मर्यादित नसून, ती जंगलाच्या समृद्धतेचे सजीव दर्शन घडवणारी आणि भविष्यातील संवर्धन कार्यासाठी मार्गदर्शन करणारी एक महत्त्वाची प्रक्रिया ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here