
संगमनेर तालुक्यात एकाच महिन्यात एकाच परिसरात सलग दुसऱ्यांदा बिबट्याने लहान मुलांवर हल्ला केल्याची घटना उघड़किस आली.
या आधी एका आईने बिबट्याच्या जबड्यातून आपल्या काळजाच्या तुकड्याला वाचविले होते.
यावेळी मात्र त्याच परिसरातील तीन वर्षीय बालिकेला मदत मिळण्यापूर्वीच बिबट्याने तिचा बळी घेतला.
या घटनेने धांदरफळ खुर्द परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली असून या घटनेत निष्पाप बालिकेचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार धांदरफळ खुर्द शिवारातील साकूर मळा परिसरात दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.00 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वाकचौरे कुटुंबीय आपल्या शेतातील मका कापणीत व्यस्त असताना घराच्या अंगणात शिवांगी संतोष वाकचौरे ही 3 वर्षांची मुलगी एकटी खेळत होती. जवळच शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याची नजर तिच्यावर गेली . बिबट्याने त्या छोट्या मूलीवर हल्ला केला. यावेळी झटापटीच्या आवाजाने तिच्या आई-वडिलांचे लक्ष जाताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाजामुळे बिबट्या बाजूच्या शेतात उडी मारुन पळून गेला.
आई-वडिल व नातेवाईकांनी तातडीने जख्मी शिवांगी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच शिवांगी मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील यांनी आपल्या कर्मचार्यांसह धांदरफळ खुर्द परिसरात जाऊन पाहणी केली.
यावेळी सरपंच रोहिदास खताळ यांनी बिबट्याचे वाढते हल्ले आणि परिसरातील बिबट्याचा सातत्याचा संचार यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाल्याचे सांगितले. त्यामुळे वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरा लावावा व बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली.
