ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील उष्णतेचा तडाखा: सफारी बुकिंग रद्द, काही पर्यटक बेहोष, वेळापत्रकात बदल

0
262

चंद्रपूर  (मोहम्मद सुलेमान बेग) :

जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या वाढत्या उष्णतेमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या काही दिवसांत काही पर्यटक वाढत्या तापमानामुळे व्याघ्र दर्शन दरम्यान तब्येत बिघडून बेहोश झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः सिनियर सिटीझन पर्यटक यामुळे अधिक त्रस्त झाल्याचे वन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेल्यामुळे अनेक पर्यटकांनी आपल्या सफारी बुकिंग्स रद्द केल्याचेही निरीक्षणात आले आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात ताडोबात पर्यटकांची मोठी गर्दी असते, मात्र यंदा उष्णतेच्या तीव्र झळांमुळे बुकिंग रेट्समध्ये घट झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने सावध पाऊल उचलत दुपारच्या फेरीच्या वेळेत बदल केले आहेत. आधीची वेळ २.३० ते ६.३० अशी होती, ती आता ३.०० ते ७.०० वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सूर्यास्ताच्या सायंकाळी थोडी गारठी मिळेल व पर्यटकांना आरामदायक अनुभव घेता येईल, अशी अपेक्षा आहे.

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्णता असलेल्या भागांमध्ये गणला जातो. त्यामुळे पर्यटकांनी योग्य कपडे, टोपी, सनग्लासेस घालणे, भरपूर पाणी सोबत ठेवणे, आणि गरज असल्यास विश्रांती घेणे आवश्यक आहे. वनविभागाकडून थंड पाण्याच्या बाटल्या, फर्स्ट-एड सुविधा, व सावलीतील विश्रांतीसाठी उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उष्णतेचा परिणाम केवळ माणसांवरच नव्हे, तर ताडोबातील वन्यजीवांवरही झाला आहे. अनेक प्राणी सध्या पाणवठ्यांच्या आसपास किंवा झाडांच्या गार सावलीत आढळून येत आहेत. वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या सोयीसाठी सौर ऊर्जेवर चालणारे बोरवेल्स वॉटरबॉडीजजवळ बसवण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांना पिण्याच्या पाण्याचा सतत पुरवठा मिळावा आणि त्यांचे जीवनमान सुरळीत राहावे.

वनविभागाने पर्यटकांना आणि वनप्रेमींना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत, वन्यजीव आणि जंगलाच्या सुरक्षिततेची जाणीव ठेवत, आपल्या सफारीचा अनुभव घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here