ताडोबा प्रशासन व रिसॉर्ट धारकांच्या बैठकीत विविध विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय

0
1414

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग) :

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली रिसॉर्ट धारकांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पर्यटन व्यवस्थापन, निसर्ग मार्गदर्शकांची (Naturalist) निवड प्रक्रिया, कंझर्व्हेशन फी, ध्वनी आणि प्रकाश प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन तसेच इतर पर्यटनविषयक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:

1. निसर्ग मार्गदर्शकांसाठी पात्रता निकष आणि परीक्षा:

– रिसॉर्ट मालकांकडून नोंदणीसाठी आलेल्या निसर्ग मार्गदर्शकांच्या पात्रतेबाबत नियम तयार करण्यात आले.
– पुढील पर्यटन हंगामासाठी वर्षातून एक-दोन वेळा परीक्षा घेण्यात येणार असून, त्यात उत्तीर्ण झालेल्यांना परवानगी दिली जाणार.
– वन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे निसर्ग मार्गदर्शकांसाठी अभ्यासक्रम सुरू केला जाणार.

2. कंझर्व्हेशन फी वेळेवर जमा करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली:
– रिसॉर्ट धारकांनी नियमित शुल्क भरण्याच्या सूचना देण्यात आल्या.
– ऑनलाइन पेमेंटसाठी सुलभ प्रणाली सुरू करण्याचा निर्णय.

3. रिसॉर्टमध्ये लग्न समारंभ आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण:
– इनडोअर कार्यक्रमांसाठी आवाज मर्यादित ठेवावा.
– उघड्या ठिकाणी रात्री 10 वाजल्यानंतर ध्वनी उपकरणे बंद ठेवण्याचे आदेश.

4. प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना:
– रिसॉर्टमध्ये उंच खांबाऐवजी जमिनीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने दिवे बसवण्याच्या सूचना.

5. घनकचरा व्यवस्थापन:
– सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक आणि इतर कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्याच्या सूचना.
– ग्रामपंचायतीच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय.

6. ग्रीन रेटिंग आणि रिसॉर्ट मूल्यांकन:
– ग्रीन रेटिंग मिळवलेल्या रिसॉर्टची यादी अधिकृत बुकिंग साइटवर प्रसिद्ध केली जाणार.

7. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी वेळेचे बंधन:
– सकाळी ठरलेल्या वेळेपूर्वी आणि रात्री 10 वाजल्यानंतर पद्मापूर व कोंडेगाव गेटवर पर्यटकांना प्रवेश मिळण्यासाठी नियम शिथिल करण्याचा विचार.

8. फुल डे सफारीबाबत सुधारणा:
– फुल डे सफारीमध्ये कोअर व बफर क्षेत्रातून एका वेळेस बाहेर पडून पुन्हा प्रवेश घेण्यास मुभा.
– अपग्रेड केलेल्या जिप्सी वाहनांची यादी प्रशासनाला देण्याचा निर्णय.

9. पर्यटनाच्या वेळांमध्ये बदल:
– 15 फेब्रुवारी ते 14 एप्रिल: **सकाळी 6.00 ते 10.00 व दुपारी 2.30 ते 6.30**
– 15 एप्रिल ते 30 जून: **सकाळी 5.30 ते 9.30 व दुपारी 3.00 ते 7.00**

10. पर्यटकांसाठी सुविधांमध्ये सुधारणा:
– जिप्सी पिकअप-ड्रॉपसाठी निश्चित दर निश्चित करण्याचा निर्णय.
– तात्काळ कोटा आणि RAC (Reservation Against Cancellation) प्रणालीमध्ये सुधारणा.

11. वन्यजीव संवर्धनासाठी उपाययोजना:
– रिसॉर्टच्या आसपास जैविक कुंपण (Bamboo Fencing) बसविण्यास परवानगी.
– सर्पदंशसाठी (Snake Bite) चार झोनमध्ये Anti-Venom औषधे आणि प्राथमिक उपचार सुविधा.

रिसॉर्ट धारकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

बैठकीच्या शेवटी कार्यकारी संचालकांनी सर्व रिसॉर्ट धारकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, व्यवस्थापन कोट्यातून परमिटसाठी वारंवार मागणी करू नये, कारण त्या कोट्यामध्ये मर्यादित जागा असतात, असे स्पष्ट करण्यात आले.

ताडोबा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयांमुळे पर्यावरण संरक्षणासोबतच पर्यटन व्यवस्थापन अधिक सुकर होण्यास मदत होईल.

ही सभा डॉ. प्रभुनाथ शुक्ल, कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी आनंद रेड्डी येल्लु, उपसंचालक (कोअर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, तसेच सचिन शिंदे, विभागीय वन अधिकारी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प उपस्थित होते.

याशिवाय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील विविध रिसॉर्ट मालक व चालकांचे प्रतिनिधी देखील या बैठकीत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here