वन शहीद – स्वाती ढुमणे. आखो देखा हाल

0
1855

मित्रांच्या आग्रहापुढे हातबल होत जंगल सफरचा पुन्हा एकदा अनुभव घेतला.आजवर तामिळनाडूतील येरीपिली,विदर्भातील शहानूर ,सेमाडोह,मेळघाट,टिपेश्वर जंगल सफारीतून फिरलो. मचानवर पाखरा सारखे लटकून रात्र काढली पण व्याघ्र दर्शन नाही ते नाहीच.
काल पुन्हा सातव्यांदा गेलोत ते ताडोबा जंगलात.उत्साही मित्रांनी, सफारी,रेस्टहाऊस बुकिंगचा सोपस्कार पार पाडले.निघतानाच आम्ही आमची निवृत्ती घोषित करून टाकली.शेवटचा उपाय म्हणून पुण्यात स्थाईक व्याघ्र मित्रांचे फोन वरून आशिर्वाद मागीतले.’उतू नको,मातू नको,घेतला वसा टाकू नको!’सल्ला देत तूला वाघ दिसणार असे सांगत आशावाद जागविला.या खेपेला वाघाचे मुख दर्शन जर करता झाले तर परभणीला आल्यावर यांना ‘फुल’ वाहण्याचा कार्यक्रम करूत असे जाहिर करीत एकाने सुखद धक्का दिला.
१० तासांची धावपळ करीत धनाजी संताजी स्टाईलने कोलारा गेटची दुपारची सफारी गाठली. हरिण,सांबर खेरीज कांहीच दिसले नाही.देशपातळीवर चर्चित माया (वाघीन) व ताला (नर)च्या शौर्य कथांनी सोबतच्या गार्डने डोकं पिकविलं. मायाच्या मागावर बसून बसून शेवटी काहीसे हताश होवून सायंकाळी परतलोत.
१८ सीटर टाटा कॅन्टर मधील पर्यटकांना माया बाईं चे दर्शन घडले होते.अकारण मनोमन त्यांचा हेवा वाटला. दुस-या दिवशीची सफारी बदलून आम्ही कॅन्टर प्रेफर केला.
शनिवार भल्य पहाटे अंधूक प्रकाश व भुरभुर पावसात आम्ही कॅन्टर ने निघालो. विस -बावीस जिप्सी सोडल्या नंतर सर्वात शेवटी बायाबापुड्यांनी भरलेला आमचा रथ निघाला. प्राण्यांनी झोपेतून उठून डोळे चोळायला अवकाश रे आमच्या नजरा त्यांना शोधू लागल्या.
गाडी सोबतचे गार्ड अंधूक प्रकाशात प्राण्यांचे पगमार्क (पाऊलखुणा) शोधून अंदाज बांधत होते.आपण मायाच्या एरियात आलो आहोत अशी सुचेना करताच सगळे टाईट झाले.मुख्य गेट पासून चार कि.मी.अंतरावर कोलारा कोअर झोन पाशी दोन तिन जिप्सी जब धरून थांबलेल्या होत्या. “शुक!..साईटिंग झालीय शांत रहा”आमच्या गार्डने दबक्या आवाजात सांगत गाडी साइडला घेतली.
तेवढ्यात शे सव्वाशे फुट अंतरावरून हळूवार माया नावाची वाघीन जंगलातून रस्त्यावर आली.पर्यटकांनी कॅमेरे, दुर्बिनी सावरल्या समोर आमच्या गाडया उभ्या पाहिल्याने ती जागेवर थबकली. एव्हाना आमच्या विरूध्द बाजूच्या रस्त्याने चार वनकामगार व एक महिला वनरक्षक ट्रांझिंट लाईन पाहत येत असल्याचे गाड्यांवरील गार्डने हेरले.त्यांनी तात्काळ बॅटरीच्या साहाय्याने त्यांना सावध करताच ते जागेवरच थबकले. ते कर्मचारी व आमच्या मध्ये माया पहुडलेली होती.
एकाएक माया रस्त्यालगत वाढलेल्या गवतात बसली. त्यामुळे आम्हाला केवळ तिच्या मानेच्या हालचाली दिसत होत्या.गाडीतील सीटवर उभे राहून जो तो श्र्वास रोखून तिच्या हालचाली बघत होता. अर्धातास त्यातच गेला.माया रस्ता सोडत नाही याचा अंदाज आल्यामुळे त्या पादचा-यांनी तिला बायपास करण्यासाठी जंगलातून वाट काढण्याचा प्रयत्न केला. एकाएक मायाने स्त्यावरून छलांग मारली ती सरळ जंगलात घुसणे आणि जोरात किंचाळण्याचा आवाज येणे एकदाच घडले. ? कळायच्या आत मायाने त्या महिला वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्यावर हल्ला करीत त्यांना ठार केले.
उर्वरीत तिन्ही मजूर हातातल्या काठ्या कु-हाडीसह ओरडत जिव वाचविण्यासाठी. आमच्या गाड्यांकडे धावले. दमादाटत ” जानवरने मॅडम को उठाया” म्हणून सांगतांना धायमोकलून रडत होते. सगळ्यांच्याच अंगाचे पाणी झाले होते. दुर्देवाने आमच्या समक्ष ताडोबा जंगलाच्या इतिहासात एक महिला वन शहिद झाली. हा सगळा थरार आमच्या देखत घडला. थरथरणा-या तिन्ही मजुरांना पर्यटकांनी जिप्सीत घेतले आणि गाड्या परत निघाल्या. पुढे सफर करण्यात कुणालाही रस नव्हता. एव्हाना परतीच्या प्रवासात ताला नावाचा दांडगा नर (वाघ) ऐन रस्त्यात उभा होता जणू आमची वाट पाहत …आपल्या मादीच्या हातून घडलेल्या प्रमादाबद्दल कदाचित दिलगीरी व्यक्त करायची असेल त्याला… आमच्या गाडी समोरून तो ऐटित हळूवार चालत गेला…आमच्या सोबतच्या पर्यटकांनी त्याला ‘भरल्या डोळ्यांनी’ कोरडेपणानं पाहिलं केवळ एक उपचार म्हणून…
स्वाती या वनखात्यातील दबंग अधिकारी होत्या.त्यांची सेवा केवळ ११ वर्ष झालेली. त्यांना चार वर्ष वयाची आरूषी मुलगी आहे.त्यांचे पती अनिल सोनकांबळे यांनी तासाभरापुर्वी आमच्या देखत स्वाती मॅडमला ड्युटीसाठी स्कुटीवर आणून सोडले होते..
मौजमजा म्हणून पर्यटनासाठी गेलेलो आम्ही…कोण कुठली ती अनोळखी महिला ?…परंतू त्यांचा तो जिवाच्या आकांताने उमटलेला चित्कार झोप उडवून गेलाय अक्षरशः
लेखक :              
मल्हारिकांत  देशमुख. परभणी  ९८३४११९७१२.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here