
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर ):
वटपौर्णिमेचे औचित्य साधून स्वाब नेचर केअर फाउंडेशन तर्फे परिसरातील विविध ठिकाणी वट वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी परिसरातील धार्मिक स्थळ सात बहिणी मंदिर परिसरात मोकळ्या जागेवर दोन वटवृक्षांच्या झाडांची लागवड, तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार व वनरक्षक श्रिरामे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर ग्रामीण रुग्णालय तळोधीच्या परिसरामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंडल यांच्या हस्ते वटवृक्षाची लागवड करण्यात आली व त्यानंतर तळोधी बाळापूरचे वनपरिक्षेत्र कार्यालय समोर सुद्धा वटवृक्षाची लागवड क्षेत्र सहाय्यक अरविंद मने यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमांतर्गत पर्यावरणामधील वटवृक्षाचे पक्षी व प्राणी यांकरिता असलेले महत्त्व वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार यांनी समजावून सांगितले.
या वृक्षारोपण करिता संस्थेचे पर्यावरण विभाग प्रमुख छत्रपती रामटेके यांनी वट वृक्षांचा पुरवठा केला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी यश कायरकर, जिवेश सयाम, नितीन भेंडाळे, शुभम निकेशर, अमन कडकडे, अमीर करकाळे, सुमित गुरनुले आदि उपस्थित होते.
