
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
सिंदेवाही तालुक्याच्या शिवनी वनपरिक्षेत्रातील बफर झोनमधील मोहाळी (नलेश्वर) हे गाव जंगलाने वेढले असून, या भागात वन्य प्राण्यांचा अधिवास असल्याने अनेकदा गावात वन्यप्राणी येत असतात दि 19 जुलै 2024 रोजी सकाळी 6.00 वाजताच्या सुमारास नागरिकांना बिबट (मादी) आपल्या दोन पिल्लांसह शिकारीच्या शोधात गावाच्या दिशेने येताना दिसली. मात्र, नागरिकांनी पाठलाग करून बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतात झुडपात असलेले बिबट दिसले नाहीत, आणि अचानक लोक जवळ गेल्याने बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात विजय देवगिरीकर (३५), मनोहर दांडेकर (५०), जितेंद्र दांडेकर (३०), सुभाष दांडेकर (२५), ऋतिक वाघमारे (१८), आणि पांडुरंग नन्नावरे (३२) हे सहा लोक जखमी झाले. जखमींना तातडीने मोहाळी येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचार करून चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
एका मादा बिबट्याला जेरबंद करण्यात यश, तर दोन बिबट जंगलाच्या दिशेने पसार झाले
गावात जमलेल्या गर्दीच्या आरडाओरडामुळे एक बिबट जंगलाच्या दिशेने पसार झाला, तर त्यानंतर त्यातील मादा बिबट बारेकर यांच्या घरातील लादनीवर लपली, आणि एक बिबट दांडेकर यांच्या घरात लपला. मात्र, एक बिबट जंगलाच्या दिशेने पळून गेला आणि मादा बिबट्याला बेहोश करून सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. बिबट्याला बघण्याकरिता गावामध्ये आजूबाजूच्या गावातील लोकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. मात्र, घरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी चंद्रपूर येथून TATR रेस्क्यू टीम, SWAB नेचर केअर संस्थेचे सदस्य, आणि सिदेवाही वनपरिक्षेत्रातील कर्मचारी यांनी अथक मेहनतीने घरात लादनीवर दडलेल्या बिबट्याला तात्काळ बेहोश करून पकडले व वन्यजीव ट्रीटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे नेण्यात आले. रेस्क्यू करण्यात आलेली मादी बिबट अंदाजे 5 ते 6 वर्षांची असून तिच्यावर कुराडीने हल्ला केल्यामुळे ती जखमी असल्याचे डॉक्टरांच्या उपचारादरम्यान निदर्शनास आले.
या रेस्क्यूच्या वेळेस TATR रेस्क्यू टीमचे डॉ. आर. एस. खोब्रागडे (पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव), श्री. ए.सी. मराठे (पोलीस नाईक, शूटर), SWAB नेचर केअर संस्थेचे बचाव पथकाचे सदस्य यश कायरकर, छत्रपती रामटेके, जिवेश सयाम, नितीन भेंडाळे, अमन करकाडे, अमीर करकाडे, गिरीधर निकुरे, शिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण आणि त्यांचे पोलीस कर्मचारी, तळोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित सिंग देवरे आणि त्यांचे पोलीस कर्मचारी, शिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर आणि त्यांचे वनकर्मचारी, तळोदी बाळापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार आणि त्यांचे वनकर्मचारी तसेच शिवनी वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वनकर्मचारी उपस्थित होते.
मात्र मादा बिबट्याला पकडल्यानंतर लोकांनी इतर दोन बिबट्यांना सुद्धा तात्काळ पकडावे म्हणून गावातील महिलांनी कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या पुढे बसून वाहने अडवली. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने विशेष दंगारोधक पथक बोलवण्यात आले. वन विभागाने परिसरात कॅमेरे लावून गावामध्ये गस्त सुरू केली आहे.
