आठवड्याभरापूर्वी निलगायच्या धडकेत रात्रपाळीचे चौकीदार सुद्धा झाले होते जख्मी
यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी) ;
नागभीड तालुक्यातील घोडाझरी अभयारण्यातील गेट क्र. १ वरील दिवसा पाळी ने चौकीदार असलेले घोडाझरी येथील गेट चौकीदार अशोक काशीनाथ रामटेके (५०) व कैलास तुकडु सयाम (४५) घोडाझरी. हे दोन्ही इसम निलगायच्या धडकेत १८ डिसेंबर २०२२ रोज सायंकाळी ६.१५ वाजता च्या सुमारास गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली.
घोडाझरी गावाकडुन गस्ती करून परत येणाऱ्या नागभीड पोलिसांना दोघेही जण गंभीर अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेले दिसले असता त्यांनी त्यांना तात्काळ उचलून नागभीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .
मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तात्काळ गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सदर घटनेतील चौकीदार हे घोडाझरीच्या गेटवर दिवसभर चौकीदारी करून सायंकाळला रात्रपाळी वरून सुट्टी झाल्यानंतर गावाकडे परत जात असताना सदर घटना घडले असल्याचे समजले जात आहे.
यापूर्वी देखील घोडाझरी गेट क्र. १ वर रात्रपाळीच्या चौकीदार रामचंद्र पंद्राम (४२) रा.खडकी हे सायंकाळी चौकीदारी करीता जात असताना त्यांना सुध्दा नीलगाय धडकल्याने अपघात होऊन किरकोळ जखमी झाले होते.
घोडाझरी अभयारण्यात मागील लॉक डाऊन नंतर वन्य प्राण्यांचा रस्त्यावरील रेलचेल चे प्रमाण खूपच वाढलेले आहे. त्यामुळे लोकांना घोडाझरी रस्त्यावर वन्यप्राण्यांच्या वावर दिसून येत आहे. याचे परिणाम रस्त्याने अपघात होणे व त्या अपघातात मनुष्य व सोबतच वन्यप्राणी जख्मी होणे हे नित्याचे झालेले आहे.
तरी वन विभागाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता रात्रीच्या वेळेस येण्या जाण्यास बंद करावा असेही परिसरातील वन्यजीव प्रेमी व ग्रामस्थांचे नेहमीचे म्हणणे आहे .परंतु याकडे वन विभाग सतत दुर्लक्ष करीत आला आहे. त्यामुळे भविष्यात मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नकारता येत नाही.
वन विभागाला मोठी घटना घडल्यावर जाग येणार का ? असे परिसरातील लोकांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे.
घोडाझरी जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने घोडाझरी मध्ये फक्त पर्यटक व घोडाझरी रिसोर्ट मध्ये येणाऱ्या लोकांनी या रस्त्याचा वापर केले पाहिजे. मात्र मजा म्हणून आजू बाजूच्या गावातील लोक सुद्धा *दुसरा मुख्य मार्ग या जंगलाच्या बाजूने असताना* सुद्धा मुद्दाम होऊन रात्रंदिवस याच रस्त्याचा वापर करतात. त्याकडे घोडाझरी गेटवर दिवसा असलेले चौकीदार हे स्वतः वन विभागाचे कर्मचाऱीच त्यांना अडवत नाही व ते सुद्धा दुर्लक्ष करून त्यांना येणे जाने करू देतात. कीटाळी , खडकी, हुमा , मंगरूळ , गोविंदपुर,घोडाझरी या गावच्या लोकांनी नागभीडला ये – जा करण्याकरीता हा रस्ता वापरू नये व चिंधीच मार्गानेच येणे – जाने करावा. अशा सूचनाचे फलक प्रत्येक गावात लावण्यात यावे व ग्रामपंचायतींला सूचना देने व काही झाल्यास कारवाईची माहिती देणे वन विभागाला आता अनिवार्य झालेले आहे. रिसोर्ट करिता सुद्धा गेट नं. २ वरून फक्त १०० मीटरच जंगल पार करावा लागतो मात्र रिसोर्ट मध्ये येणे जाने करणारे लोक सुद्धा गेट नं. १ वरुन याच रस्त्याचा वापर करतात . व वन्यप्राण्यांचे दर्शन करतात, काही जंगलाचे सैर सपाटा करण्याचे उद्देशाने रिसार्ट चे नाव सांगून व रिसोर्ट मध्ये राहणारे लोक सुद्धा रात्रंदिवस या रस्त्याचा वापर करतात. याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात की काय ? असेही प्रश्न लोकांनी निर्माण केलेला आहे .
सदर रस्ता वन्यप्राण्यांचा वावर असल्यामुळे रात्रसाठी बंद करण्यात यावे . तसेच काही वर्षांपूर्वी या परिसरात नाईट सफारी सुरू करण्याचा मानस असताना परिसरातील विविध वन्यजीव संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला होता. तरी काही लोक त्या मार्गाने प्रवेश करतात त्यांच्यावर आळा आणून मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत होईल असेही वन्यजीव प्रेमींचे मागणे आहे.