वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार अनुदान वितरणाची कार्यवाही
मुंबई : चंद्रपूर जिल्हयात वनवृत्ताअंतर्गत ब्रम्हपूरी, मध्य चांदा, चंद्रपूर या वनविभागातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी ३ कोटी १ लक्ष ११ हजार ८२६ इतके अनुदान वितरीत करण्यात आले आहे. वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार सदर अनुदान वितरणाची कार्यवाही पुर्ण करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हयात चंद्रपूर वनवृत्ताअंतर्गत ब्रम्हपूरी, मध्य चांदा, चंद्रपूर या वनविभागात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींची संख्या १० असुन जखमी झालेल्या व्यक्तींची संख्या ४३ इतकी आहे. पशुधन हानीची एकुण प्रकरणे ३६२ आहेत. जखमी पशुधनाची एकुण प्रकरण १५ असुन पिक हानीची १९२५ इतकी प्रकरण आहेत. अनुदान उपलब्ध नसल्याने या प्रकरणांमध्ये संबंधीत व्यक्तींकडून वनविभागाकडे सातत्याने नुकसान भरपाईची मागणी केली जात होती. वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार या विषयाची तातडीने दखल घेत चंद्रपूर वनवृत्ताअंतर्गत एकुण २३५५ प्रकरणांसाठी एकुण ३ कोटी १ लक्ष ११ हजार ८२६ इतके अनुदान तातडीने वितरीत करण्याचे निर्देश संबंधीतांना दिले. हे अनुदान वितरीत करण्यात आले असुन आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत व जखमी झालेल्या, मृत झालेले पशुधन व जखमी पशुधन तसेच पिक हानी प्रकरणातील प्रलंबित नुकसान भरपाई संबंधीतांना मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
नुकताच काही दिवसापुर्वी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना देण्यात येणा-या नुकसान भरपाईच्या रकमेत १५ लाखावरुन २० लाख इतकी वाढ वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच मृत झालेले पशुधन व जखमी पशुधन तसेच पिक हानी प्रकरणातील नुकसान भरपाई च्या रकमेत देखील लक्षणीय वाढ करण्यात आली आहे हे विशेष.