क्वचितच दृष्टीस पडणारा व दुर्लभ असा पिवळा पळस चिचपल्ली जवळील जंगलात फुलला असून निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे .निसर्गातील वन्यजीव, पशुपक्षी तसेच अनेक झाडे जी दुर्मिळ आहेत त्यांच्या बाबतीतील अनेक अंधश्रद्धामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्या जाते .पिवळ्या व पांढऱ्या पळसाची सुद्धा गुप्तधन, जादूटोणा ,औषधे आदींसाठी कत्तल होते तसेच विविध अंधश्रद्धा मुळे पिवळा व पांढरा पळस एक रहस्यमय गुढतेचे आवरण ओढून जंगलात फुलतो आणि निसर्गप्रेमींसोबतच मांत्रिक ,गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या आणि आयुर्वेदिक औषधांच्या जाणकारांना तो आकर्षित करतो. याबाबतीत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक व निसर्गप्रेमी अनिल दहागावकर म्हणतात की ,फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणून ओळखला जाणारा पळस अतिशय आकर्षक रित्या जंगलात व इतरत्र फुलतो आणि त्याच्या फुलन्याने वसंत व चैत्र ऋतूत निसर्गाला एक वेगळेच मोहून टाकणारे सौंदर्य लाभते, परंतु पिवळा व पांढऱ्या पळसा बाबतच्या अंधश्रद्धाच निसर्गातील या सुंदर व दुर्मिळ झाडाच्या कत्तलीला कारणीभूत ठरतात .तेव्हा पिवळ्या व पांढऱ्या पळसाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सोबतच वनविभाग व पर्यावरण क्षेत्रातील संस्थांनी पुढे येऊन कार्य करणे काळाची गरज आहे .