इरई धरण परिसरात वयस्कर वाघ मृतावस्थेत आढळला; T-24 वाघीण असण्याची शक्यता

0
732

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारामपेठ नियतक्षेत्र अंतर्गत भामडेळी गावालगत इरई धरण परिसरात एक वयस्कर वाघ मृतावस्थेत आढळून आला. गस्तीदरम्यान वनकर्मचाऱ्यांना हा मृत वाघ आढळून आला असून, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ कळविण्यात आले.


घटनास्थळी श्री. संकेत वाठोरे (ACF), श्री. संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली, श्री. धनंजय बापट, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य, श्री. बंडू धोतरे (राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी), श्री. मुकेश भांदककर (प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रतिनिधी), डॉ. कुंदन पोडचेलवार (पशुवैद्यकीय अधिकारी, ताडोबा), डॉ. पुरुषोत्तम कडूकर (सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग), श्री. मिलिंद जक्कुलवार (पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, मोहर्ली), तसेच संबंधित वनपाल, क्षेत्रीय वनरक्षक व पंच उपस्थित होते.
घटनास्थळाची तपासणी करताना मृत वाघाची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार मृत्यू अंदाजे 15 ते 20 दिवसांपूर्वी झाल्याचे दिसून आले. 31 मार्च रोजी एका शेतकऱ्याने शेतातील कडबा जाळण्यासाठी लावलेल्या आगीमुळे इरई धरण परिसरातील गवताळ क्षेत्रही जळाले होते. मृत वाघाचे नखे, दात आणि हाडे शाबूत असून शरीराचा काही भाग आगीत अर्धवट जळाल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासात ही आग वाघाच्या मृत्यूनंतर लागल्याचे स्पष्ट झाले आहे, कारण मृत शरीरावर असलेल्या अळ्याही आगीत जळाल्याचे निदर्शनास आले आहे.
शवविच्छेदनानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवश्यक नमुने गोळा केले असून, मृत्यूचे नेमके कारण व वाघाची ओळख पटवण्यासाठी हे नमुने DNA तपासणीसाठी सीसीएमबी, हैदराबाद येथे पाठविण्यात आले आहेत.
सदर परिसरात 16 मार्च 2025 पर्यंत वाघीण T-24 व तिचे तीन बछडे नियमितपणे दिसून येत होते. फेब्रुवारी 2025 मध्ये बछडे दोन वर्षांचे झाल्यानंतर T-24 पासून वेगळे झाले. त्यानंतर 16 मार्चपासून T-24 दिसून आलेली नसल्याने तिचा शोध सुरू होता. त्यामुळे मृत वाघ हा T-24 असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणी वनगुन्हा क्रमांक 09643/241055 नोंदवण्यात आला असून, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक श्री. कुशाग्र पाठक आणि श्री. संकेत वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहर्ली, पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here