वाघाचे बछडे मरणे ही घटना वेक अप कॉल, पुनरावृत्ति होऊ नये : कल्याण कुमार, मुख्य वन संरक्षक, नागपूर

0
209

भंडारा :

“वाघीणींच्या दोन बछडयांचा विहिरीत बुडून जीव जाणे ही अतिशय दुर्दैवी घटना असली तरीही या घटनेला मी ‘वेक अप कॉल’ समजतो. आपल्याला मिळालेली ही एक वॉर्निंग असून अशा घटना पुनः घडू नये ही आमची पहिली प्राथमिकता आहे,” अशी प्रतिक्रिया श्री. कल्याण कुमार, मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक), नागपूर यांनी आज भंडारा दौऱ्या दरम्यान दिली.


भंडारा वन परीक्षेत्रात गराडा बुजुर्ग गावाच्या तलावाजवळून गेलेल्या टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या सायफण विहिरीत वाघिणीच्या दोन अल्पवयीन (2 महीने) बछडयांचा बुडून मृत्यू झाला होता. घटना स्थळाच्या परिसरात कालच वाघिणीच्या पायांचे ठसे आढळून आले होते. आज मुख्य वन संरक्षक कल्याण कुमार यांचे सोबत उप वन संरक्षक एस. बी. भलावी, सहायक वन संरक्षक यशवंत नागुलवार आणि साकेत शेंडे, वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान आणि नदीम खान घटनास्थळी पोहोचले व दुर्घटना कशी झाली असावी यावर सविस्तर चर्चा केली.
वाघिण हजर नसतांना झाली असेल दुर्घटना
सदर विहीर ही गराडा बुजुर्ग तलावाच्या पाणलोट क्षेत्रात आहे. या विहिरीत पावसाळा वगळता पाणी साचून राहत नाही. एकंदरीत परिस्थिति बघता सायफण विहिरीत थंडावा असल्या कारणाने, वनपरिक्षेत्राला लागून असल्याने व लोकांचा वावर नसल्याने वाघीणीने कदाचित आपल्या पीलांना तिथे ठेवले असेल. ज्या वेळेला वाघिण शिकरीला गेली असेल अगदी त्याच वेळेला जोरदार पाऊस झाल्याने डोंगर दऱ्यांवरून, जंगलातून पाणी या पाणलोट क्षेत्रात येऊन वेगाने या विहिरीत आले असेल व लहान बछडयांना बाहेर निघता न आल्याने व पाण्याचा स्तर अचानक वाढल्याने त्यांचा मृत्यू झाला असेल अशी शक्यता वर्तविण्यात आली. पाऊस थांबल्यावरही पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पावसाच्या प्रवाहाने त्यांचे मृत शरीर विहीरीच्या दुसऱ्या बाजूला आले जिथे सकाळी व्यायाम करणाऱ्या युवकांना ते दिसले. या प्रक्रियेत स्वयंसेवी अजहर हुसेन, निहाल गणवीर, डॉ. बोरकुटे यांनी सहकार्य केले.

बछडयांच्या शोधात आईची तळमळ

घटनास्थळी वाघिणीचे ‘पगमार्क’ आढळून आल्याने काल वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांनी दोन्ही विहीरीवर 4 ‘कॅमेरा ट्रॅप’ लावले होते. आज सकाळी कॅमेरा ट्रॅपची माहिती घेतली असता याच ठिकाणी वाघिण आपल्या बछडयांचा शोध घेताना दिसून आली. विहीरीच्या कठड्यावर तिने ओरबडले असून भिंतीला चिकटून असलेले तिचे केस दिसले. पश्चिमेकडील विहीरीच्या किनाऱ्यावर बसून अंग आत झोकून देऊन जणूकाही एक आई आपल्या पिलांचा तळमळीने शोध घेत असल्याचे कॅमेऱ्यात दिसून आले आहे.

प्रीकास्ट सिमेंटचे आवरण करणार
कल्याण कुमार, मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक) यांच्या सूचने नुसार पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मानवटकर, कनिष्ठ अभियंता गायधने व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सायफण विहीरीचे निरीक्षण करून त्यावर कोणत्या उपाय योजना करता येतील यावर वन विभाग अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक व पाटबंधारे विभाग अधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा झाली. त्या उपरांत दुपारी पाटबंधारे विभागाचे रवी पराते, अधीक्षक अभियंता, नागपूर यांच्या उपस्थितीत सीमेंटच्या प्रीकास्ट मटेरियल चे आवरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरात लवकर हे कार्य पूर्ण करण्यात येईल असे सांगण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here