चंद्रपूर : – चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे तुकूम परिसरातील खासरे इंटरप्राइजेस, बाजार वॉर्ड येथील मुनाफ टेभला,बंगाली कॅम्प येथील गुप्ता ट्रेडींग कंपनी, मुल्लाजी चिकन सेंटर अशा विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत २०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असुन व त्याच्या कडून ४० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
सदर कारवाई गोदाम, दुकाने यावर करण्यात आली असुन कारवाई दरम्यान प्लास्टिकचे ताट, कप, ग्लास, चमचे,खर्रा पन्नी अशा स्वरूपाचे प्रतिबंधित प्लास्टिक आढळुन आले. या सर्व दुकानदारांकडुन दंड वसुल करण्यात आला असुन दुकानात पुन्हा प्लास्टिक आढळल्यास पोलीस तक्रार करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीसाठी मनपा मार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठाने, दुकानांवर कारवाई सुरु आहे. यादरम्यान प्लास्टिक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जाणार आहे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड, दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये आणि तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.
चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिलेले असुन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत मनपाच्या तीनही झोनच्या संयुक्तपणे मोहीम राबवून शहरातील व्यवसाय प्रतिष्ठाने, दुकाने यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ.अमोल शेळके यांच्या उपस्थितीत महेंद्र हजारे,भूपेश गोठे, प्रदीप मडावी व उपद्रव शोध पथकाद्वारे करण्यात आली.