ओला आणि सुका कच-यांचे योग्‍य प्रकारे वर्गीकरण करण्‍यासाठी जिल्‍हयात विशेष मोहिम

0
126

मुख्‍य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांचे आदेश.

अभियान कालावधी: 8 जुलै ते 7 ऑगस्‍ट 2024

स्वच्छतेचे दोन रंग- ओला हिरवासुका निळा जागृतीसाठी गृहभेटी

चंद्रपूर (जिल्हा प्रतिनिधी) :  दिनांक- ७/७/२०२४.आपल्‍या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्‍हयात सोमवार दिनांक 8 जुलै 2024 पासून विशेष मोहिम राबविण्‍याचे आदेश  जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विवेक जानसन यांनी यंत्रणेला दिले आहे.दिनांक 8 जुलै ते 7 ऑगस्‍ट 2024 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्‍याचे निर्देश राज्‍य शासनाने दिले आहेत. त्‍यानुसार जिल्‍हयातील प्रत्‍येक गावात स्‍वच्‍छतेचे दोन रंग- ओला हिरवा, सुका निळा या नावाने अभियान राबविण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत राज्य माहे डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. प्रत्‍येक गावात 5 संवादकाची निवड करण्‍यात येणार असून, हे संवादक प्रत्‍येकाच्‍या घरी जावून संदेश देणार आहेत. यात सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही व बचत गटातील महिलांचा समावेश आहे.

ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात ठेवावा. तसेच सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवण्‍यासंदर्भात तसेच नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पध्दतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय आणि नियमित वापर आदि बाबत गृहभेटीतून माहिती देण्‍यात येणार आहे. भेटी दरम्यान शासनाच्‍या गुगललींकव्‍दारे त्या कुटुंबाची फोटोसह माहिती भरण्‍यात येणार आहे. गट विकास अधिकारी यांनी आपल्‍या तालुक्‍यातील गावांचे प्रती कुटूंब पाच या प्रमाणे संवादक तयार करुन गृहभेटीचे आयोजन करावे. या कामी तालुक्‍यातील सर्व अधिकारी, विस्‍तार अधिकारी यांनी संनियंत्रण करुन अंमलबजावणी करावी. दर आठवडयाला या अभियानाचा जिल्‍हास्‍तरावरुन आढावा घेण्‍यात येईल. दिनांक 8 जुलै ते 7 ऑगस्‍ट दरम्‍यान राबविण्‍यात येणा-या ओला व सुका कचरा व्‍यवस्‍थापनासाठी ग्रामस्‍थांनी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहनही जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन  यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here