(वनविभाग व स्वाब संस्थेद्वारे पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित)
चंद्रपूर :
5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली व मारुती चितमपल्ली यांच्या जयंती निमित्ताने देशभरात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर 7 नोव्हेंबर रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील ठकाबाई तलाव परिसरात सकाळी 6.30 ते 10.30 वाजेपर्यंत पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन ‘स्वाब नेचर केअर फाउंडेशन’ आणि ‘सिंदेवाही वनविभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. पक्षी निरीक्षणाच्या प्रारंभीच राष्ट्रीय पक्षी मोरांचे दर्शन झाल्याने उपस्थितांमध्ये उत्सुकता वाढली. यावेळी हरियाल, धनेश यांसारख्या 32 विविध पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली.
विद्यार्थ्यांसह जिज्ञासूंना पक्षी ओळख, त्यांचे पर्यावरणातील महत्त्व समजून सांगण्यासाठी पक्षी निरीक्षक डब्ल्यू.पी.एस.आय.चे रोशन धोतरे, अक्षय मेश्राम व स्वप्निल मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर आणि स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी पर्यावरण जागरुकतेवर भाष्य केले.
कार्यक्रमात ‘ज्ञानधारा अकॅडमी’चे महेश लेनगुरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच वनविभागाचे कर्मचारी आणि स्वाब संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले यांनी आभार प्रदर्शन केले.