महाराष्ट्र पक्षिमित्रचे ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे दिनांक १० व ११ एप्रिल २०२१ या रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित केले जाणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील जेष्ठ पक्षी अभ्यासक, प्रा. डॉ. निनाद शहा यांची निवड करण्यात आली आहे. आगामी ३४ वे संमेलन डॉ. मेतन फाउंडेशन सोलापूर तर्फे आयोजित करण्यात येत असून या संमेलनासाठी महाराष्ट्र वन विभाग सोलापूर व सामाजिक वनीकरण विभाग सोलापूर यांचे सहकार्याने लाभणार आहे.
सोलापूर नगरीत या पूर्वी १६ वे संमेलन १९९७ साली विहंग मंडळाने आयोजित केले होते, या संमेलनासाठी त्यावेळी मा. मनेका गांधी उपस्थित रहिल्या होत्या. या संमेलनाचे आयोजन करण्यासाठी त्यावेळी प्रा. डॉ. निनाद शहा हे प्रमुख होते. राज्याचे वन विभागाचे माजी सचिव तथा तत्कालीन जिल्हाधिकारी मा. प्रवीणसिंह परदेशी हे त्या संमेलनाचे मुख्य संयोजक होते. त्यानंतर तब्बल २३ वर्षानंतर सोलापूर येथे संमेलन होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापुरातील प्रा. डॉ. निनाद शाह यांची निवड कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या आभासी बैठकीत करण्यात आली.
प्रा. डॉ. निनाद शहा हे सोलापूर येथील वालचंद महाविद्यालय येथून प्राणीशाश्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले असून पक्षिमित्र चळवळीत ते गेली तीन दशकांपासून सक्रीय कार्यरत आहेत. संमेलनाचे आयोजन, अनेक संमेलनांना उपस्थिती, सोलापूर येथील नान्नज माळढोक अभयारण्य यावर अभ्यास, सोलापूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसेच पर्यावरण व वन विभागाच्या अनेक समित्यांवर सदस्य म्हणून कार्य केलले डॉ. शहा हे महाराष्ट्रातील पक्षिमित्र चळवळीतील अग्रणी आहेत. सोलापुरात पुन्हा होत असलेल्या संमेलनासाठी आयोजकांना त्यांचे मार्गदर्शन लाभत असून ते या संमेलनाचे महाराष्ट्र पक्षिमित्र समन्वयक सुद्धा आहेत.
सोलापूर येथील संमेलनाची नोंदणी तसेच सादरीकरण व स्मरणिका लेख पाठविण्यासाठी नोंदणी ऑनलाईन पद्धीतीने सुरु असून पक्षीमित्रांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपल्या पक्षिमित्रांना नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन आयोजक डॉ. मेतन फाउंडेशन सोलापूर तर्फे करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून सदर आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२३५९३४७५ किंवा ९७६४९३४४४० या मोबाईलवर व्हाट्सअप करा किंवा सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत संपर्क साधता येईल.