
आमच्या “ऋतुविराज”च्या भिंतीजवळ सकाळच्या कोवळ्या उन्हात वात्सल्याचा नितांत सुंदर झरा पहायला मिळाला. वासरू इतकं शुभ्र व गोंडस होतं की त्याला कवटाळून प्रेमाने गोंजारावंसं वाटलं, वासराजवळ जाण्याचा प्रयत्नही केला पण मी अनोळखी असल्यामुळे कदाचित ती मला ढुशी मारण्याच्या पावित्र्यात होती. ऊगीच त्यांना त्रास देण्यापेक्षा मग त्या मायलेकराचं वात्सल्य डोळाभर साठवून ठेवावं वाटले. आपल्या वासराला प्रेमाने चाटताना पाहून कां कोण जाणे मलाही माझ्या आईची माया उरात उचंबळून आली अन् खळकन् डोळ्यात पाणी तरळून आलं. आईच्या मातृत्वाला तोड नाही.
“हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामधी दिसते माझी माय ” या हृदयस्पर्शी गीताची आठवण झाली व मी ते प्रत्यक्ष अनुभवत आहे या अनुभूतीने मन हेलावून गेले.
वासराच्या एक एक लिला न्याहाळताना मन हरखून गेले. कधी तो तिच्या आंचळाला तोंड लावायचा, तर कधी तिच्या पायाच्या मागे घुटमळायचा, मध्येच तिने हळूच लाथ मारून त्याला खाली बसवलं. त्याला ऊन लागू नये म्हणून स्वतःची सावली त्याच्यावर धरली. गोजिरवाणं वासरू मान पाठीवर टाकून डोळे मिटून झोप घेण्याचं सोंग करीत होता की खरंच झोपला होता हे त्यालाच ठाऊक!
पण माय लेकराचं हे वात्सल्याने ओतप्रोत प्रेम पाहून मन आनंदून गेले. हा आनंदाचा अलौकिक ठेवा मनात साठवून मी कारने चंद्रपुरला रवाना झालो.
राजेश महाजन, गडचिरोली
