नागपूर : आज दि. ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी नागपूर येथील एफडीसीएम भवन मध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा उद्यानाच्या संवर्धनासाठी आढावा बैठक वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. प्रकल्पात आता पर्यंत करण्यात आलेली कामे आणि पुढील काळात हाती घेण्यात येणाऱ्या कामांबाबत एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक आणि त्यांचे अधिनस्थ अधिकाऱ्यांबरोबर वनमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली.
एफडीसीएम गोरेवाडा प्राणी उद्यान या subsidiary कंपनीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वरिष्ठ दर्जाच्या भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
एफडीसीएम अंतर्गत वनक्षेत्रपाल दर्जाच्या अधिकाऱ्यांवर वन व वन्यप्राण्यांचे संरक्षणाची समान जबाबदारी असल्याने वन विभागातील वनक्षेत्रपाल प्रमाणेच संरक्षण प्रयोजनार्थ मोटार वाहने मंजूर करणे अभिप्रेत आहे. ही बाब धोरणात्मक असल्याने त्यास एफडीसीएमच्या संचालक मंडळासमोर सादर करण्याची सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. गोरेवाडा प्राणी उद्यान प्रकल्पाला आणखी चालना देण्याचा दृष्टीने विविध कामांसाठी व्यवस्थापकीय संचालक एफडीसीएम यांना सध्या असलेली २ कोटी रुपयांची मर्यादा वाढून ५ कोटी रुपयांपर्यंत मान्यता प्रदान करणे तसेच एफडीसीएम प्रमाणेच गोरेवाडा प्रकल्पासाठी सेवानिवृत्त मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना ५ कोटी रुपयांपर्यंत तांत्रिक मान्यता प्रदान करण्याचे अधिकार देण्याबाबत तत्वतः सहमती प्रदान केली.एफडीसीएमकडून वन विभागास हस्तांतरित वनक्षेत्राच्या मोबदल्यात योग्य वन क्षेत्र एफडीसीएमला परत करण्याबाबत शासनस्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कन्हारगाव अभयारण्यातील वनक्षेत्र अद्याप एफडीसीएमच्या ताब्यात आहे. प्रशासकीय दृष्ट्य़ा सदर अभयारण्य वनविभागाकडे असणे आवश्यक आहे. कन्हारगाव अभयारण्य लवकरच वनविभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत शासन स्तरावरून औपचारिक निर्देश जारी करण्याबाबतची सूचनाही वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. आजच्या बैठकीला एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौड, महाव्यवस्थापक नागपूर प्रदेश ऋषिकेश रंजन, गोरेवाडा प्राणी उद्यान प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत, गोरेवाडा प्राणी उद्यान प्रकल्पाचे प्रकल्प संचालक अर्जुन त्यागी, जनरल क्युरेटर दीपक सावंत, नागपूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक ए. प्रवीण आदी उपस्थित होते.