भद्रावती वन परिक्षेत्रांतर्गत चालबर्डी गावातील शेतात दिनांक 03 जानेवारी 2022 रोज सोमवारी सकाळच्या सुमारास वाघिणीचा मृतदेह आढळून आला. या वर्षात वाघाच्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.
चालबर्डी-कोंडा रस्त्यावरील शेताच्या पायवाटेवर एका गावकऱ्याला मृतदेह पडलेला आढळल्याने ही बाब उघडकीस आली. याची माहिती मिळताच भद्रावती परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) हरिदास शेंडे यांच्या नेतृत्वात पथक घटना स्थळी दाखल होऊन गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
मृत वाघिणी सुमारे तीन वर्षे वयाची असून विद्युत ताराच्या साहाय्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निर्दशनात आले आहे. तृणभक्षी शेतात घुसणाऱ्या तृणभक्षी प्राण्यांना अडवण्यासाठी शेतात टाकलेल्या विद्युत तारेमुळे वाघिणीचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मृत वाघिणीच्या शरीराचे सर्व अवयव शाबूत होते.
शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय वन्यजीव अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली पशुवैद्यांच्या पथकाने वाघिणीचे शवविच्छेदन केले. मृत वाघिणीच्या डाव्या मागच्या पायावर पशुवैद्यकांना विद्युत शॉकचे चिन्ह आढळून आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. शवविच्छेदनादरम्यान विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक (तेंदू) निकिता, शेंडे, महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे सदस्य बंडू धोत्रे (राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून) आणि PCCF चे प्रतिनिधी म्हणून मुकेश भांदक्कर उपस्थित होते.