देव संस्कृती विश्वविद्यालय हरीद्वार द्वारा आयोजित ६०० व्या रविवारीय वृक्षारोपण समारोह संपन्न.
वृक्ष लावणे व त्याची जोपासना करणे हे ईश्वरीय कार्य आहे. पर्यावरण संवर्धन तसेच नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण यासाठी वृक्ष लागवड अत्यंत आवश्यक आहे. धन या जन्माच्या शेवटच्या क्षणापर्यंत कामी येईल तर वन पुढच्या जन्माच्या सुरूवातीपासून कामी येईल. ज्या प्रमाणे जन्मदात्या आईचे ऋण आम्ही कधिही फेडू शकत नाही, मात्र वसुंधरा मातेचे ऋण आपण वृक्ष लागवड करून व त्याची जोपासणा करून फेडू शकतो. मी जेव्हापासून महाराष्ट्रात मंत्री झालो तेव्हापासून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने काम करीत आहे. देव संस्कृती विश्वविद्यालय यांच्या माध्यमातुन गेल्या ६०० रविवारी वृक्षारोपणाचे ईश्वरीय कार्य केले जात आहे ही अभिनंदनीय बाब आहे. या पर्यावरण संरक्षण तसेच ६०० व्या रविवारीय वृक्षारोपण समारोहाला मला उपस्थित राहता आले याचा मनापासून आनंद आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक १ मे २०२२ रोजी हरीद्वार येथील देव संस्कृति विश्वविद्यालय द्वारा आयोजित पर्यावरण संरक्षण तथा ६०० व्या रविवारीय वृक्षारोपण समारोहात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी देव संस्कृति विश्वविद्यालय हरीद्वारचे कुलाधिपती डॉ. प्रणव पंडया, कुलपती श्री. शरद पारधी, प्रतिकुलपती डॉ. चिन्मय पंडया, कुलसचिव श्री. बलदाऊ देवांगण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, मी महाराष्ट्राचा वनमंत्री असताना तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला होता. लोकसहभागातुन हा संकल्प आम्ही पूर्ण केला. महाराष्ट्रात विक्रमी वृक्ष लागवड या काळात झाली. १८२० पासून औद्योगिक क्रांती सुरू झाली व तिथून वृक्षतोड सुरू झाली. ग्लोबल वार्मींग, क्लाईमेंट चेंज हे सर्व शब्द आता नित्याचे झाले आहे. पूर्वी मॅन ईज सोशल अॅनिमल असे म्हटले जायचे. मात्र आज हा प्रवास मॅन इज सेल्फिश अॅनिमल असा सुरू आहे. जिथे प्राणवायु आहे तिथे जीवन आहे. संयुक्त राष्ट्र संघात देखील आता पर कॅपिटा इनकम ऐवजी हॅप्पीनेस इंडेक्स बद्दल बोलले जाते. देव संस्कृती विश्वविद्यालयाच्या माध्यमातुन पर्यावरण संवर्धनाचे ईश्वरीय कार्य सुरू आहे यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो असेही आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिकुलपती डॉ. चिन्मय पंडया यांनी केले. महाराष्ट्रात वनमंत्री असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या वृक्षारोपण मोहीमेचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाला देव संस्कृती विश्वविद्यालयाशी संबंधित गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.