एक कुटुंब, एक रोजगार’ योजनेच्या विरोधात 1 ऑक्टोबर पासून जिप्सी असोसिएशन आणि गाईड्स युनियनचा संप

0
787

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मागील काही महिन्यांपासून गाईड आणि जिप्सी चालक/मालकांवर जबरदस्तीने नियमावली लादली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच जिप्सी वेलफेअर असोसिएशनने यापूर्वी वनविभागाकडे अनेकदा काही मागण्यांसाठी निवेदने सादर केली होती, परंतु त्यावर कोणताही विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे जिप्सी असोसिएशनने पुन्हा एकदा आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन सादर केले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास, जिप्सी असोसिएशनने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
त्या मागण्या खालील प्रमाणे आहें.
1. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर क्षेत्रातील जिप्सीधारकांना 15 वर्षाची मुदत वाढ देण्यात यावी.
2. ‘एक कुटूंब एक रोजगार’ हा नियम तात्काळ रद्द करण्यात यावा.
3. चालु व पुढील सत्रापासून जिप्सी नुतनीकरण प्रस्तावाला नाहरकत प्रमाणपत्र जोडले जाणार नाही.
4. बफर/कोर मधील ड्रायव्हर यांना आपापल्या कार्यक्षेत्राकरीता सक्ती करण्यात येवू नये.
5. जिप्सीमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला फक्त मार्गदर्शकच असावा.
6. पर्यटकाच्या तक्रारीवरुन जिप्सी चालक व मार्गदर्शकाचे मत घेतल्याशिवाय कोणतीही कार्यवाही (सस्पेंड) करु नये.
7. नियमित सुरु असलेल्या बफर/कोर जिप्सीचे नोंदणी नुतनीकरण प्रमाणपत्र दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत  देण्यात यावे.
8.आपल्या कार्यालयात विविध विषयांच्या संदर्भात भेट घेण्याकरिता अधिल्या कार्यालयाला विविध विषयाच्या संदर्भात भेट घेण्याकरीता फक्त जिप्सी मालक / मार्गदर्शक यांना कोलारा, ताडोबा, मोहर्ली, चंद्रपूर येण्या-जाण्याकरीता मुभा देण्यात यावी.
9. सफारी शुल्क सरसरकट वफरला 3000/- रुपये तसेच कोरला 3500/- रुपये याप्रमाणे शुल्कात वाढ करावी.
10. कोर व बफर जिप्सीधारक कुटूंबाला वर्षास्त्री एकदा निशुल्क जंगल भ्रमंतीची परवानगी देण्यात यावी.
11. आपातकालीन सेवेसाठी चालक व मार्गदर्शक यांना मोबाईल वापरण्याची मुभा देण्यात यावी.
12. जिप्सी वेलफेअर असोशिएशनचे प्रतिनिधी स्थानिक सल्लागार समितीमध्ये समाविष्ठ करण्यात यावे.
13. मध्य प्रदेश टायगर रिझर्व अंतर्गत सुरु असलेल्या जिप्सींना दहा वर्षावरुन पंधरा वर्षापर्यंत कालावधी वाढविला, तेव्हा महाराष्ट्रात सुध्दा लागू करावा.
14. पर्यटन क्षेत्रात वाहनाची वेग मर्यादा 40 कि.मी. ठेवण्यात यावी.
15. कोर जिप्सी कोटयातून 3 जिप्सी कमी करुन वनविभागाने कॅटर सुरु केली व ते ही बंद करुन क्रुझर सफारी वाहन सुरु केले असल्याने ते वाहन बंद करुन स्थानिकांच्या कोर कोटयात 3 जिप्सीची वाढ करण्यात यावी.
करीता उपरोक्त मागण्याची योग्य ती दखल घेवून सदर मागण्याची पुर्तता करुन आम्हाला लेखी स्वरुपात कळवून न्याय देण्यात यावे.
अन्यथा दि. 01 ऑक्टोबर 2024 पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्व कोर/बफर जिप्सीधारक बेमुदत संप करून जंगल भ्रमंतीवर जिप्सी नेणार नाही, याची नोंद घ्यावी.
असे निवेदनाद्वारे वन विभागाला कळविण्यात आले असून, महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे.
तसेच, महाराष्ट्र राज्य अभयारण्य गाईड्स युनियनचे 5 वे राज्य अधिवेशन साकोली मध्ये 24 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते व या अधिवेशनात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात लागू करण्यात आलेल्या ‘एक कुटुंब, एक रोजगार योजनेच्या विरोधात 2 ऑक्टोबर 2024 पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गाईड्स आणि जिप्सी चालक-मालकांनी अनिश्चितकालीन संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिवेशनात ताडोबा, नवेगाव नागझिरा, कोका, पेंच, मानसिंग देव, करंडला , टीपेश्वर, मेळघाट अशा विविध व्याघ्र प्रकल्पांमधून मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here