गडचिरोली वनविभागाच्या चातगांव वनपरिक्षेत्रातील घटना
(मृत वाघाचे तीन पाय व तोंडाचा मिशीचा भाग जबड्यासहित कापलेल्या स्थितीत आढळले)
यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी) :
मागील चार दिवसांपूर्वी नियतक्षेत्र अमिर्झा, उपक्षेत्र अमिर्झा, वनपरीक्षेत्र –चातगाव, गडचिरोली वनविभागच्या कक्ष क्र. 417 च्या जंगल परिसरात एक नर वाघाचा मृतदेह आढळून आला होता.
सदर घटनेची तपासणी केली असता असे निर्देशनास आले की वाघाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने (Electrocution) झालेले आहे. तसेच मृत वाघाचे तीन पाय व तोंडाचा मिशीचा भाग जबड्यासहित कापलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. सदर घटनेची कसून शोध घेणे सुरु आहे.
प्राप्त माहीतीचे अनुषंगाने घटनेतील संशयीत व्यक्तींना 26 ऑक्टोबर 2023 रोजी मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन ६ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
त्यात 1) प्रमोद मनोहर मडावी, रा. मरेगाव टोली वय 29 वर्ष 2) सुनिल केशव उसेंडी, रा. मरेगाव टोली वय 28 वर्ष 3 ) दिलीप रुषी उसेंडी, रा. मरेगाव टोली वय 28 वर्ष 4 ) प्रकाश दयाराम हलामी, रा. मरेगाव टोली वय 42 वर्ष 5) चेतन सुधाकर अलाम, रा. मरेगाव टोली वय 25 वर्ष 6) निलेश्वर शिवराम होळी रा. मोहटोला ता. जि. गडचिरोली येथील रहिवासी असून त्यांच्या कडून मृत वाघाचे पायाचा पंजा, नखे, दात व शिकारीसाठी वापरलेले अवजार कुऱ्हाड, सुरा जप्त करण्यात आलेला आहे.
त्याबाबतचा आरोपी विरुध्द वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर प्रकरणाची चौकशी मिलीश दत्त शर्मा, उपवनसंरक्षक गडचिरोली वनविभाग यांचे मार्गदर्शनात चौकशी अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक (जंकास) संकेत वाठोरे हे करीत आहेत.