
चंद्रपूर :- बांबू क्षेत्रात उद्योग रोजगार तसेच स्वयंरोजगाराची प्रचंड क्षमता आहे. बांबू लागवडीतून शेतकरी सुद्धा समृद्ध होऊ शकतो, परंतु बांबूच्या औद्योगिक सामाजिक व आर्थिक सामर्थ्याबाबत समाजात जनजागृती नसल्यामुळे तरुण वर्ग, युवक विद्यार्थी, शेतकरी या क्षेत्राकडे वळताना पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही. विशेषत: विदर्भातील लोक प्रचंड रोजगाराची क्षमता असलेल्या या क्षेत्राबाबत उदासिन दिसतात म्हणून या क्षेत्राबाबत जनजागृती होणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने बांबूटेक ग्रीन सर्विसेस, पि.के. आर्ट अँड डिझाईन स्टुडिओ आणि बांबू आर्ट अँड नेचर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बांबूटेक कार्यशाळा, चिचपल्ली येथे चिंचाळा गावातील विद्यार्थी युवकांसाठी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत बांबूचे औद्योगिक आर्थिक सामाजिक व पर्यावरणीय महत्त्व, बांबूक्षेत्रातील उद्योग आणि रोजगाराची संधी, बांबू लागवड – एक शाश्वत शेती, बांबू हस्तकला, विविध क्षेत्रातील बांबूचा कलात्मक उपयोग आदी विषयावर बांबूटेकच्या संचालिका व बांबू तंत्रज्ञ अन्नपूर्णा धुर्वे_ बावनकर संचालक अनिल दहागावकर, पि.के. आर्ट अँड डिझाईन स्टुडिओचे संचालक व नामवंत चित्रकार प्रवीण कावेरी, ज्येष्ठ बांबू कारागीर व मास्टर ट्रेनर भुजंग रामटेके, बांबू तंत्रज्ञ श्वेता बावणे, इंटेरिअर डिझायनर व युवा बांबू अभ्यासक भूषण नंदनवार यांनी विस्तारपूर्वक मार्गदर्शन केले. याप्रसंगी छायाचित्रकार नंदू सोनारकर, बांबू शेतकरी रवी कश्यप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आदित्य निकुरे, बांबूटेकचे पर्यवेक्षक भास्कर शेरकी, सुरज सोनारकर, बांबू कारागीर रोशन जुमडे, प्रणित मारोटकर, विशाल बावणे, ध्रुवदास मंडरे यांनी परिश्रम घेतले.
