तेंदुपुड्याची वन विभागाकडून जप्ती

0
566

पळसगाव ग्रामसभेची पोलिसात व प्रशासनाकडे तक्रार दाखल

.दोषी व्यक्तीवर व वन विभागावर कार्यवाहीचे मागणीसाठी वनहक्क धारकांचा उपोषण सत्याग्रह सुरू.

चंद्रपूर : पळसगाव ग्रामसभेने तेंदू हंगाम २०२२ मधील हिरवा तेंदूपत्ता संकलन दि. ५ एप्रिल २०२२ रोजी सुरू केले. यापूर्वी वन विभागाला पत्राद्वारे ग्रामसभा तेंदूपत्ता संकलन करणार असल्याची माहिती दिली. मात्र वन विभागाने तेंदू संकलनाच्या पहिल्या दिवसापासूनच जप्तीची कार्यवाही केली व तेंदू संकलन बंद करण्याची ग्रामसभेला ताकीद दिली.
स्थानिक वनहक्क समितीने ग्रामसभा आयोजित करून व विचारविनिमय करून झालेल्या ठरवानुसार कार्यवाही करून चार दिवसात १०७ मानक गोणी (१०७००० तेंदूपुडे) तेंदुपत्ता संकलित केला.
या दरम्यान वन विभागाने दररोज ग्रामसभेची अडवणूक केली. ग्रामसभेच्या वतीने कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर वन विभागाने ग्रामसभेचे तेंदू संकलन वैद्य मानले मात्र फक्त ४० गोणी तेंदुपुडे ग्रामसभा गोळा करू शकते या ताफ्यासह ग्रामसभेचे ६७ बोध वन विभागाने नेले आहे. वन विभागाचे वारंवार केलेल्या कार्यवाहीत उन-वारा-पाऊस व विभागाने नेल्यामुळे तेंदू पत्त्याची मोठी हानी झाली. त्यास वनविभाग जबाबदार असून सदर नुकसानीची भरपाई वन विभागाने ग्रामसभेला केली पाहिजे अशी प्रतिक्रिया ग्रामसभा प्रतिनिधी डोमा शिवरकर, वर्षा लोणकर यांनी व्यक्त केली आहे.
शांततेच्या मार्गाचा अवलंब करीत उपोषण सत्याग्रह ग्रामसभेच्या वतीने दी. २४/५/२०२२२ पासून सुरू आहे. मात्र प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली दिसत नाही.
ग्रामसभा ही गावाची संसद आहे. ग्रामसभा सार्वभौम असून ग्रामसभेचे निर्णय अंतिम व बंधनकारक मानले पाहिजे असा कायद्याचा भक्कम आधार असताना वन विभागाचे अधिकारी ग्रामसभेच्या कार्यवाही विरोधात मनमानी पद्धतीने वर्तन करून वनहक्क धराकांवर अन्याय, अत्याचार करीत आहे’ असा सुद्धा ग्रामसभा प्रतिनिधींचा आरोप आहे. पोलिसांनी व शासकीय प्रशाशनाने ग्रामसभेच्या मागण्या विचारात घेऊन दोषींवर कार्यवाही करावी आणि वनहक्क धारकांना न्याय द्यावा अशी उपोषण कर्त्या ग्रामस्थांनी रास्त मागणी आहे.
सन २०१६ मध्ये ग्रामसभेने वनहक्क कायद्यानुसार वनहक्क प्राप्त केले त्यात पळसगाव येथील एकूण ३८३.१५ हे. वनक्षेत्रापैकी ३८१.१५ हे. वनक्षेत्र हे निसर्ग संसाधनावरील हक्कासाठी ग्रामसभेने प्राप्त केले आहे. आता वन विभाग कडे वनक्षेत्र उरले नाही तरी सुद्धा वन विभागाने ग्रामसभा, ग्राम पंचायत ला न विचारता शासकीय लिलाव केला. तेंदू संकलन संदर्भात केलेल्या अभ्यासाप्रमाणे प्रती हेक्टर ७-९ गोणी तेंदू पुडा सकलित होतो. मात्र क्षेत्र संचालक ताडोबा व्याघ्र प्रकल्प यांनी ३८१ हे. मधून फक्त ३९ गोणी तेंदूपत्ता संकलित केला पाहिजे असे बंधन ग्रामसभेवर लादण्याचे प्रयत्न केले व शेवटी ग्रामसभेच्या ६७ बोध (सुमारे ७० मानक गोणी) तेंदुपत्ता जबरदस्तीने वन विभागाने नेला आहे.
त्यामुळे ग्रामस्थांमध्ये वनविभागाचे अधिकारी विरोधात तीव्र संताप पसरला आहे. हजारो वनहक्क धारकांनी पुकारलेल्या उपोषण सत्याग्रहाचा विदर्भातील वनहक्क प्राप्त अनेक ग्रामसभा, ग्रामसभा महासंघ व सामाजिक संस्था संघटनांच्या भरपूर पाठिंबा मिळत आहे. पळसगाव ग्रामसभेच्या मागण्या लवकर मान्य केल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here