सातारा वन विभागा ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दि. 4 ऑक्टोबर रोजी वनविभागाने श्री.दत्त पूजा भांडार, सदाशिव पेठ सातारा आणि पंचमुखी पूजा साहित्य, सदाशिव पेठ सातारा व 5 ऑक्टोबर रोजी कोटेश्वर पूजा साहित्य, शाहू स्टेडीयम सातारा या ठिकाणी छापा घालून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व जैव विविधता कायदा २००२ अन्वये बाळगणे, विक्री करण्यासाठी प्रतिबंधित असलेल्या इंद्रजाल/काळे कोरल नावाच्या समुद्री प्राण्याचे मृत अवशेष व इतर प्रतिबंधित वन्यप्राणी/वस्तू विक्री करताना आढळून आल्याने गुन्हा दाखल केला आहे.
सातारा शहरातील श्री.दत्त पूजा भांडार,सदाशिव पेठ सातारा व कोटेश्वर पूजा साहित्य,शाहू स्टेडीयम सातारा येथील पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात धाडी टाकून सदरची कारवाई करण्यात आली.
या कारवाईत श्री.दत्त पूजा भांडार या दुकानात ५९ इंद्रजाल/काळे कोरल मिळून आले असून त्याबरोबर चंदनाचे सुमारे ८० किलो तुकडे व सुमारे ६०० मोरपिसे मिळून आले आहेत.
सदर वस्तू वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९,३९,४३,४४,४८,४९,५१ अन्वये व जैव विविधता कायदा २००२ च्या कलम ७,२४,५८,६१ अन्वये प्रतिबंधित आहे.
दुकान चालक संतोष लक्ष्मण घोणे यांना अटक केली सदरचा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असून त्यासाठी किमान ३ ते कमाल ७ वर्षापर्यंत शिक्षा आहे.
दुकान चालक संतोष लक्ष्मण घोणे यांना अटक केली असून मा.न्यायाधीश JMFC सातारा यांनी आरोपीस ०७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
पंचमुखी पूजा साहित्य,सदाशिव पेठ सातारा या दुकानात आरोपी दत्तात्रय सदाशिव धुरपे, यांना चौकशी साठी ताब्यात घेतले असून त्यांचेकडून ८.५ किलो वजनाचे चंदनाचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत.
दिनांक 5 ऑक्टोबर रोजी कोटेश्वर पूजा साहित्य,शाहू स्टेडीयम या ठिकाणी सकाळी टाकलेल्या धाडीत आरोपी राहुल विजय निकम यास चौकशीकामी ताब्यात घेतले असून हत्ताजोडी या घोरपड या वन्य प्राण्याच्या शरीराचा भाग असलेले ९ (नऊ ) अवशेष व मोरपिसे मिळून आले आहेत, त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व जैव विविधता कायदा २००२ अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई सुरु आहे.
सदर कारवाई महादेव मोहिते,उपवनसंरक्षक सातारा वनविभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सुधीर सोनवले,सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण)सातारा,डॉ.निवृत्ती चव्हाण,वनक्षेत्रपाल (प्रा) सातारा, पावरा,वनपाल सातारा,श्री.प्रशांत पडवळ,वनरक्षक सुहास भोसले, साधना राठोड, राजू मोसलगी, अशोक मलप, सूर्याजी ठोंबरे, वाहन चालक सुरेश गभाले, संतोष दळवी यांनी केली.