चंद्रपूर:-
पर्यावरण रक्षणासोबतच औद्योगिक, आर्थिक व सामाजिक विकास साधण्याची प्रचंड क्षमता असलेल्या तसेच हिरवं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबूची पाचशे रोपटे लावून बांबूटेक ग्रिन सर्व्हिसेसच्या वतीने जागतिक बांबू दिवस साजरा करण्यात आला.
मामला येथील मनीष रायकुंडलिया यांच्या शेतात तसेच चिचपल्ली जवळील जांभार्ला स्थित “बांबूटेकच्या” आवारात बांबू रोपट्यांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी बांबूटेकच्या संचालिका व बांबू आर्ट अँड नेचर सोसायटीच्या सचिव अन्नपूर्णा धूर्वे-बावनकर यांनी बांबूचे औद्योगिक व सामाजिक महत्त्व विशद करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. सोबतच एक प्रशिक्षित बांबू तंत्रज्ञ म्हणून त्यांचा बांबू क्षेत्रातील प्रवास व अनुभव सांगून कोरोना काळात सुद्धा त्यांनी प्रशिक्षित बांबू कारागिरांना कसा रोजगार उपलब्ध करून दिला या विषयी सुद्धा अनुभव कथन केले. बांबू अभ्यासक अनिल दहागांवकर यांनीही बांबूचे विविध उपयोग व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्यावसायिक मनिष रायकुंडलिया, प्रफुल जाधव यांच्यासह बांबूटेक ग्रिन सर्व्हिसेसचे निलेश पाझारे, राजेश भलमे, भुजंग रामटेके, घनश्याम टोंगे,पंकज हजारे, प्रणय सुखदेवे, समीर नैताम, आकाश आत्राम, देवकन्या नैताम, अनुश्री मेश्राम, किशोर टोंगे, रोशन जुमडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती