
चिचपल्ली:-
चिचपल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आय.व्ही. स्टँड अभावी रुग्णांची गैरसोय होत असल्याचे लक्षात येताच बांबूटेक ग्रिन सर्विसेस आणि हिरव सोन बांबू कारागीर संस्थेच्या माध्यमातून आरोग्य केंद्राला बांबू पासून निर्मित आकर्षक, कलात्मक व पर्यावरण स्नेही असे बांबू आय.व्ही. स्टँड सामाजिक दायित्व म्हणून भेट देण्यात आले.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे होते तर सरपंच गिरीजा आत्राम, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता भंडारी, ग्रामपंचायत सदस्य रवि सूत्रपवार, चरण कुमरे, इम्रान पठाण, नारायण खापणे, हिरव सोन संस्थेचे पदाधिकारी भुजंग रामटेके, निकेश बावणे आणि बांबूटेक च्या संचालिका अन्नपूर्णा धुर्वे-बावनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना गौतम निमगडे म्हणाले की प्लास्टिक, लोखंड व लाकडाला बांबू हा उत्तम पर्याय ठरू शकतो व यातून पर्यावरण रक्षणासोबतच रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकते. तर अन्नपूर्णा धुर्वे म्हणाल्या की परिसरात एखादी समस्या जाणवली तर केवळ प्रशासनाला दोष देत बसण्यापेक्षा एक सुजाण नागरिक म्हणून आपले कौशल्य व ज्ञानाचा उपयोग करून ती समस्या आपण लोकसहभागातून कशी सोडवू शकतो याचा विचार होणे गरजेचे आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट स्वरूप मिळाले बांबू आय.व्ही. स्टँड हे लोकसहभाग, कौशल्य, कल्पकता व सामाजिक जबाबदारी यांचा सुरेख परिणाम आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरव सोनचे सर्व पदाधिकारी-सदस्य आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
